September 23, 2024

महाराष्ट्र माझा – हिंदू मित्राच्या मुलीचे मुस्लिम दांपत्याकडून कन्यादान!

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

पाचोरा : सध्या हनुमान चालिसा, (Hanuman Chalisa) भोंगे आदींमुळे राज्याचे राजकारण धार्मिक (Communal hates) द्वेष निर्माण करून गढूळ करण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून केला जात आहे. परंतु अशा कुठल्याही धार्मिक द्वेषाला भीक न घालता सामाजिक सलोखा जपणारीही काही मंडळी आहे, याची प्रचीती आंबे वडगाव (ता. पाचोरा) येथे आली. गावात झालेल्या एका विवाह सोहळ्यानं सर्वांचच लक्ष वेधलं… हिंदू (Hindu) मित्राच्या मुलीचे या मुस्लिम दांपत्याने कन्यादान करून एकतेचे दर्शन घडवले.

शिंदाड (ता. पाचोरा) येथील वाल्मीक अहिरे यांचे मित्र हाजी युनूस शाह पिंपळगाव बसवंत (नाशिक) येथे वास्तव्यास आहेत. अहिरे यांची कन्या प्रियंका हिचा विवाह आंबे वडगाव (ता. पाचोरा) येथील भास्कर शिंदे यांचे पुत्र विशाल यांच्याबरोबर आंबे वडगांव येथे नुकताच झाला.

विवाह निश्चितीपासून ते विवाह पार पडेपर्यंत वाल्मीक अहिरे यांचे मित्र हाजी युनूस शाह खांद्याला खांदा लावून त्यांच्यासमवेत सर्व ठिकाणी उपस्थित राहिले. विवाहप्रसंगी पिंपळगाव बसवंत येथून म्हणजे सुमारे दोनशे किलोमीटरवरून पत्नी परवीन व शालकासह त्यांनी उपस्थिती दिली. विवाह सोहळा पार पडल्यानंतर हाजी युनूस शाह पत्नीसह प्रियंकाच्या कन्यादान विधीसाठी बसले व त्यांनी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात हिंदू धर्मानुसार कन्यादानाचे सर्व विधी पूर्ण केले.

पवित्र रमजानचा महिना सुरू असल्याने शाह दांपत्याने या वेळी अल्लाहला देखील प्रियंकाच्या सुखी संसारासाठी विनवणी करत साकडे घातले. प्रियंकाचे कन्यादान करून त्यांनी हंडा, कळशी व तांबे धातूचा कलश भेट दिला. हिंदू मित्राच्या मुलीच्या विवाहास उपस्थिती लावून व हिंदू विधीप्रमाणे तिचे कन्यादान करून मैत्रीतील जिव्हाळा, मानवतेचा ओलावा तसेच जातीय, धार्मिक एकता अहिरे व शाह या मित्रांनी सिद्ध केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending