September 23, 2024

उदयनराजे पुन्हा राष्ट्रवादीत? उद्या शरद पवारांसोबत होणाऱ्या भेटीची चर्चा…

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम
     

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या सातारा येथे होणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. यावेळी पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील मुख्य नेत्यांसोबत ते चर्चा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या गोटातून समोर आली असतानाच चर्चा सुरू झाली ती म्हणजे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीची.
उद्या शरद पवार यांची भेटी घेण्यासाठी उदयनराजे भोसलेही जाणार आहेत. मात्र ही भेट कुठल्या विषयावर होणार याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह येथे उदयनराजे भोसले हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा होणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या चर्चेत साताऱ्याच्या राजकारणावर विचारमंथन होणार का? याकडे सातारकारांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीतील नेते आणि उदयनराजे यांच्यात संघर्ष झाल्यानंतर उदयनराजेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून थेट भाजपमध्ये प्रवेश करत आपले राजकारण सुरू ठेवले. मात्र, महाराष्ट्रात आता राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. यामुळे उदयनराजेंना विकास कामे करायची असतील, तर आघाडीतील वरिष्ठ नेत्यांना हाताशी धरुनच काम करावे लागणार आहे. काही महिन्यात नगरपालिका निवडणुका होणार आहेत. यामुळे उदयनराजे आणि पवार यांच्यातील ही भेट महत्वाची मानली जात आहे. आमदार शिवेंद्रराजेंना शह देण्यासाठी उदयनराजेंची ही नवी खेळी तर नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. अगदी कालच राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांची भेट घेऊन उदयनराजेंनी अर्धा तास चर्चा केली. आमदार मकरंद पाटील हे प्रथमच जलमंदीर या उदयनराजे यांच्या निवासस्थानी गेल्याचे बघायला मिळाले होते. यामुळे कालची भेट आणि उद्या होणाऱ्या शरद पवार आणि उदयनराजेंच्या भेटीत नक्की खिचडी शिजणार? असा प्रश्न आता सातारकरांना पडला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वाढत्या भेटीगाठीमुळे उदयनराजे पुन्हा राष्ट्रवादीत जाणार की काय? अशी चर्चा आता दबक्या आवाजात साताऱ्यात सुरू आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending