September 22, 2024

बंगालच्या उपसागरात मान्सून धडकला, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

0
Contact News Publisher

उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात मान्सून दाखल होत आहे. अंदमान-निकोबारनंतर मान्सून बंगालच्या उपसागराला धडकला आहे. येत्या काही दिवसांत केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन होणार आहे. दरम्यान, पुढील ५ दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, विदर्भातील काही भागात उन्हाचा तडाखा कायम राहणार असून तापमानाचा पारा कायम असणार आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हालचालीसाठी दक्षिण भारतात पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित परिसरात बहुतांशी ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद केली गेली आहे. अंदमान निकोबार बेटांवरील बहुतांश ठिकाणी मान्सूनचं आगमन झाल्यानंतर आता दक्षिण बंगालच्या उपसागरात देखील मान्सून धडकला आहे.
याचा एकंदरीत परिणाम म्हणून पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने आज पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा (येलो अलर्ट) इशारा दिला आहे. येत्या काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending