September 22, 2024

विजय चौधरी यांना चौथास्तंभ पत्रकारिता पुरस्कार, पत्रकार दिनी मुंबईत पुरस्काराचे वितरण

0
Contact News Publisher

खुलताबाद – ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून अप्रतिम मीडियाच्या वतीने “राज्यस्तरीय चौथास्तंभ विकास पत्रकारिता पुरस्कार” देऊन राज्यातील पत्रकारांना गौरव करण्यात येणार आहे.
यात कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट पत्रकारितेसाठी दिला जाणारा पुरस्कार खुलताबाद येथील ‘महाराष्ट्र टाइम्स’ चे पत्रकार विजय चौधरी यांना दिला जाणार आहे.

६ जानेवारी रोजी हा पुरस्कार वितरण समारंभ यशवंतराव चव्हाण सेंटर मंत्रालयासमोर मुंबई येथे होणार असून या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे,विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्राचे उपाध्यक्ष अजय आशर, सिने अभिनेते व निर्माते मंगेश देसाई, विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर तसेच विशेष गौरवमूर्ती एमएस आरडीसीचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार, अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, विठ्ठल साखर कारखान्याचे प्रवर्तक अभिजीत पाटील, निमंत्रक उद्योगपती विवेक देशपांडे व रणजीत कक्कड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी “अप्रतिम महावक्ता २०२२ – २०३२ दि पब्लिक टॅलेंट रियालिटी शो शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने”
या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

खुलताबाद येथील पत्रकार विजय चौधरी हे गेल्या ३० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, पर्यटन, धार्मिक, राजकीय विशेषतः कृषी क्षेत्रातील प्रश्न समस्या लेखनातून प्रभावीपणे व वस्तुनिष्ठपणे मांडल्या आहेत. विजय चौधरी यांचे “पर्यटनाचे तीर्थक्षेत्र” हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. विजय चौधरी यांना यापूर्वी ३० पेक्षा अधिक पत्रकारिता पुरस्कार मिळाले आहेत, विशेष उल्लेखनीय म्हणजे राज्य शासनाच्या कृषी व फलोत्पादन विभागाच्या वतीने सन २०१५ चा तत्कालीन राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात पत्रकारितेद्वारे दिलेल्या योगदानाबद्दल तत्कालीन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सन २०१६ -२०१७ मध्ये “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले आहे.

गेल्यावर्षी २०२२ मध्ये उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने तत्कालीन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मराठवाडा विभागीय स्तरावरील “उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सकारात्मक पत्रकारिता कशी असावी, याचा परिपाठ पत्रकार विजय चौधरी यांनी घालून दिला आहे, त्यांनी भविष्याचा वेध घेणारी पत्रकारिता केली असून खुलताबाद तालुक्यातील पत्रकारितेत वेगळे स्थान निर्माण केले आहे.

६ जानेवारी रोजी आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक विवेक देशपांडे, रणजित कक्कड, अप्रतिम मीडियाचे डॉ अनिल फळे, प्रीतम फळे, निशांत फळे यांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending