September 22, 2024

धक्कादायक! आई-बाबांना वेळ नाही, वाढदिवसालाही ते नाहीत, तिने निर्णय घेतला, घरातून 500 रुपये घेतले अन्…

0
Contact News Publisher

आई आणि बाबा दोघंही नोकरी करतात. त्यामुळे मुलांकडे पहायला वेळ नाही, ही ओरड अनेकदा ऐकायला मिळते. पालकांकडे मुलांसाठी वेळ नसेल तरी, आहे त्या काहीच क्षणांचा उपयोग कसा केला पाहिजे, हे शिकायला पाहिजे. सध्या आई-बाबा घराबाहेर नोकरीसाठी का जातात, आपल्याला एकटं का सोडतात, या सगळ्यांची कारणं मुलांना समजली पाहिजेत. आई बाबांची धावपळ आणि मुलांची घालमेल यात संवादाचा अभाव असेल तर परिस्थिती अगदी कठीण होऊन बसते. औरंगाबादमध्ये अशीच काळजात चर्र करणारी घटना घडली आहे. आई-बाबांना वाढदिवसाच्या दिवशीही वेळ नाही, हा राग मनात धरून मुलीने टोकाचं पाऊल उचललं..

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीच्या मनात आई-बाबांबद्दल अशी अढी निर्माण झाली. वाढदिवसाच्या दिवशी तरी त्यांनी वेळ द्यावा, अशी तिची अपेक्षा होती. तसं घडलं नाही. अखेर सायंकाळी ती ६ वाजता ट्यूशन होती. घरातून तिने ५०० रुपयांची नोट घेतली. दोन मैत्रिणींसोबत ट्यूशनला गेली, ती परत आलीच नाही. इकडे आई-बाबा घरी आल्यानंतर शोधाशोध सुरु झाली. मैत्रिणींच्या घरी विचारलं तर त्याही घरी आल्या नव्हत्या. तिन्ही कुटुंबातले पालक हैराण झाले.

अखेर दुसऱ्या दिवशी सदर मुलीच्या घराजवळच या तिघी सापडल्या. रात्रभर कुठे होत्या, काय केलं, याची माहिती त्यांनी पोलिसांसमोर उघड केली. घरातून नाराज होऊन निघाल्यावर पुढे काय काय केलं, याची धक्कादायक कहाणी तिने पोलिसांना सांगितली आणि पालकांसहित सर्वांनाच धक्का बसला.सदर मुलीने घरच सोडण्याचा निर्णय घेतला. मैत्रिणींनाही तयार केलं. सोबत ५०० रुपये घेतले. रात्री रेल्वेने मनमाड गाठलं. पण तिथे रेल्वे स्टेशनवर भीती वाटू लागली. त्यामुळे पुन्हा माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. पुन्हा सकाळी छत्रपती संभाजीनगरात पोहोचल्या. रिक्षाने घरापर्यंत आल्या. पण पोलिसांची शोधाशोध होत असेल या भीतीने लपून बसल्या.

इकडे पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. रात्रभर शोधाशोध सुरु होती. सकाळीही पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. मुली घरी पोहोचण्याच्या आधीच पोलिसांच्या हाती लागल्या. त्यानंतर त्यांनी सर्व कहाणी उघड केली. मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांनंतर त्यांचे जबाब नोंदवून घरी पोहोचवण्यात आलंय. मुली सुखरूप असल्याने पालकांचा जीव भांड्यात पडला. आजच्या काळात असंख्य पालकांना ही घटना धडा शिकवणारी ठरली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending