September 21, 2024

बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानावरून शिवसेना नेते शिरसाट संतप्त!

0
Contact News Publisher

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत केलेल्या विधानामुळे शिवसेनेचे नेते चांगलेच संतप्त झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ जागांपैकी २४० जागा लढणार असल्याचे ते काल एका बैठकीत म्हणाले होते. त्यामुळे शिंदे गटाच्या वाट्याला फक्त ४८ जागा येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र बावनकुळे यांच्या या फॉर्म्युल्यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे. ४८ जागा लढवायला आम्ही मूर्ख आहोत काय? बावनकुळे यांना अधिकार कोणी दिला? त्यांनी आपल्या अधिकारात बोलावे, अशा शब्दात संजय शिरसाट यांनी बावनकुळे यांना सुनावले.

चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानामध्ये काही दम नाही. भाजपने बावनकुळेंना एवढे अधिकार दिलेले नाहीत. त्यांना कोणी अधिकार दिला? हे असे स्टेटमेंट दिल्याने युतीत बेबनाव येतो. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. याची जाणीव त्यांनी ठेवावी. ४८ जागा लढवणारे आम्ही काय मूर्ख आहोत काय? याची वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. त्या बैठकीत जो निर्णय होईल ते वरिष्ठ नेते जाहीर करतील. त्यांना जाहीर करू द्या, असा संताप संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

बावनकुळेंचा हा अतिउत्साह आहे. अतिउत्साहाच्या भरात त्यांनी ते विधान केलं आहे. त्यांना वाटते की मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे, त्यामुळे माझ्या नेतृत्वात पक्षाला जास्त जागा मिळाव्यात. त्यात काही वावगं नाही. पण अशा विधानामुळे आपले सहकारी पक्ष आहेत त्यांना त्याचा त्रास होतो. मित्र पक्ष दुखावले जातात. याचे भान बावनकुळे यांनी ठेवायला पाहिजे. खरंच का भाजप एवढ्या जागा लढवणार? मग आमच्या वाट्याला काय येणार आहे, असे प्रश्न मित्र पक्षातील नेत्यांमध्ये निर्माण होतात. त्यामुळे आपल्या अधिकारात जे आहे, तेवढच त्यांनी बोलावे. जो काही मोठा निर्णय असतो. तो प्रदेशाध्यक्ष किंवा स्थानिक कमिटी घेत नाही. जागा वाटपाचा जो काही निर्णय आहे. तो वरिष्ठ पातळीवर होईल. त्यामुळे थोडी सबुरी ठेवा. नको त्या प्रतिक्रिया देऊ नका, असे शिरसाट म्हणाले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending