September 21, 2024

मंगळसूत्र चोरास अटक, ८ गुन्हे उघड, टोळीतील तीन साथीदार फरार; सराफाच्या ताब्यातून चोरीचे सोने केले जप्त

0
Contact News Publisher

गुन्हे शाखेच्या पथकाला मंगळसूत्र चोरीचे ८ गुन्हे उघड करण्यात यश आले आहे. पोलिसांनी एका मंगळसूत्र चोरास अटक केली असून चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफाकडून सोने जप्त केले आहे.

पोलिसांनी १९ मे रोजी योगेश सीताराम पाटेकर (२४, मूळ रा.भोकर, ता. श्रीरामपूर, जि. नगर, ह. मु. श्री स्वामी समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर) याला अटक केली. त्याने गुन्ह्यांची कबुली देत आपल्यासोबत विनोद उर्फ खंग्या विजय चव्हाण (रा. श्रीरामपूर), अक्षय त्रिभुवन (रा. वैजापूर) आणि राहुल बर्डे (रा. भोकर, ता.श्रीरामपूर) हे तिघे साथीदार असल्याचे सांगितले.

नक्की घडले काय?

संबंधित चोरटे योगेश बाबूराव नागरे या सराफाकडे जाऊन सोन्याचे वजन करत असत. त्यानुसार सोन्याचे समान तीन हिस्से करून वाटप करून घेत. नागरे कमी किमतीत हे सोने खरेदी करत असे. हे चोरटे मंगळसूत्र चोरीसाठी दुचाकीही चोरीच्याच वापरत असत. चोरी करताना पकडले गेलो तर दुचाकी जागीच सोडून पळ काढता येईल असा त्यामागील हेतू असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगीतले.

गुन्हे दाखल

योगेश पाटेकरवर श्रीरामपूर, एमआयडीसी वाळूज आणि पुंडलिकनगर ठाण्यात ५ मंगळसूत्र चोरीचे गुन्हे दाखल आहेत. फरार आरोपी विनोद चव्हाण याच्यावर सर्वाधिक १० गुन्हे दाखल असून त्याने शिर्डी, लोणी, कोपरगाव, श्रीरामपूर व राहुरी येथून मंगळसूत्रे चोरली आहेत. अक्षय त्रिभुवन याच्यावर शिर्डी, एमआयडीसी वाळूज, हर्सूल व जवाहरनगर ठाण्यात मंगळसूत्र चोरीचे ६ गुन्हे दाखल आहेत.

अशी होती चोरीची पद्धत

आरोपीने सांगितले की, बहुतांश वेळा पायी जाणाऱ्या महिलेच्या विरुद्ध दिशेने दुचाकीवर येत मंगळसूत्र हिसकावून भरधाव वेगात निघून जात होतो. तर काही ठिकाणी पत्ता विचारण्याचा बहाणा करत महिलेला बोलण्यात व्यग्र ठेवून मंगळसूत्रे पळवत होतो.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending