अपघात नव्हे पूर्वनियोजित हत्या!, मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप; खुलताबाद-शुलिभंजन अपघात प्रकरणाला नवे वळण
शुलिभंजन येथील दत्त मंदिराच्या समोरील पटांगणात कार चालवताना रिल शूट करताना कार दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू झाला. सोमवारी झालेल्या या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्रातून रिलच्या मोहाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. आता या अपघातास वेगळे वळण प्राप्त झाले आहे. मयत श्वेता सरोसे हिच्या कुटुंबीयांनी तो अपघात नसून पूर्वनियोजित हत्येचा कट असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात अपघातावेळी सोबत असलेला मित्र सुरज मुळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्वेताचा मोठा भाऊ मनीष यांनी केलेल्या आरोपानुसार, अपघातातील चारचाकीला रिव्हर्स घेण्यासाठी विशिष्ट बटन असून ते दाबून वर खेचून पुढे लोटावे लागते. त्यामुळे चुकून रिव्हर्स गिअर पडला, असे म्हणणे चुकीचे आहे. जाणूनबुजून तिला रिव्हर्स गिअर टाकून गाडी हातात देण्यात आली. तसेच शहरापासून ३० ते ४० किलोमीटर लांब जाऊन नेमकी दरी असलेल्या ठिकाणीच तिच्या हाती गाडी का दिली याचा तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याचबरोबर याप्रकरणात पोलिस प्रशासनाने गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली आहे. आम्ही आक्रमक झाल्यावर त्यांनी साधारण कलमे लावून गुन्हा दाखल केला, असा आरोप करताना याप्रकरणी पोलिस अधीक्षकांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.
निष्काळजीपणामुळे झालेली घटना
सदर प्रकरणाचा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. दरी व वाहन चालवण्याची जागा यात बरेच अंतर होते. त्यामुळे यात घातपात नसून अपघातच आहे. वाहन चालवता येत नसतानाही निष्काळजीपणाने वाहन हातात दिल्याने झालेला हा प्रकार आहे. या अपघातामुळे सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे.
– धनंजय फराटे, पोलिस निरीक्षक, खुलताबाद पोलिस ठाणे