पुणेकरांसाठी पुढचा आठवडा खऱ्या परीक्षेचा; अजित पवार करणार लॉकडाऊन कडक
पुणे, 8 मे : पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 10 मे ते 17 मे पर्यंत कन्टेन्मेंट झोनमध्ये ‘लॉकडाऊन’ची (टाळेबंदी) कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि पोलीस विभागाला निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबई पाठोपाठ पुणे हे महत्त्वाचे शहर आहे. येथील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण चिंता वाढवणारे आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या कार्यरत असलेले अधिकारी सक्षम असले तरी त्यांच्या मदतीसाठी इतरही अनुभवी अधिकारी दिले आहेत. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्य विभाग या सर्वांनी समन्वय राखून आपापली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी.
कोरोनाचा संसर्ग रोखण्याबरोबरच खरीप हंगामाचीही जबाबदारी जिल्हा प्रशासनावर येणार आहे. यामध्ये योग्य तो समन्वय राखून नियोजनबध्द काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कोरोना रोखण्याच्या कामाला गती यावी यासाठी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी डॉ. नितीन करीर आणि महेश पाठक यांचीही नेमणूक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
परराज्यातील जे मजूर आपापल्या राज्यात जाऊ इच्छित असतील त्यांना रेल्वेने पाठविण्याचे नियोजन करण्यात यावे, असे सांगून उपमुख्यमंत्री पवार यांनी या मजुरांच्या प्रवासाचा खर्च राज्य शासन किंवा सीएसआर फंडातून (सामाजिक उत्तरदायित्व निधी) करण्यात येईल, असे सांगितले. शहरातील ज्या भागात कोरोना बाधित रुग्ण अधिक आहेत, तेथून कोणालाही बाहेर जाऊ देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
राज्य राखीव दलाची मदत
राज्य राखीव पोलीस दलाची मदत घ्यावयाची असेल तर तीही मदत उपलब्ध करुन दिली जाईल,असेही त्यांनी सांगितले. महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे महापालिकेच्यावतीने 70 हजार कुटुंबाना शिधा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच मास्क, सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात येत आहे. याशिवाय नियमित आरोग्य तपासणी उपक्रमही राबविण्यात येत आहे.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात 837 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 885 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 891 असल्याची माहिती दिली.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व अधिकारी परस्पर समन्वयाने काम करत असून लवकरच कोरोना संसर्ग रोखण्यात यश येईल, अशी आशा व्यक्त केली. दुकाने उघडणे, नागरिकांना पेट्रोल-डिझेल उपलब्ध होणे याबाबत स्वयंस्पष्ट सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. परराज्यात तसेच पुणे जिल्ह्याच्या बाहेर दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ इच्छिणा-या नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक ते उपाय योजल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी कोरोनाचे रुग्ण जास्त आढळून आलेल्या वस्तीजवळ 5 स्वॅब सेंटर सुरु करण्यात आले. याशिवाय 6 मोबाईल स्वॅब युनिटही सुरु करण्यात आले आहेत, असं सांगितलं.