*तरुणाचा खून प्रकरणात कुख्यात गुंडांची टोळी जेरबंद*
वाळूज औद्योगिक परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे 17 मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास भर चौकात खून करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी दुसऱ्या जिल्ह्यात पळून जात असताना मोठ्या शिताफीने पकडून गजाआड केले आहे. परिसरात आपली दहशत कायम राहावी. या उद्देशाने या चौघांनी योगेश प्रधान या तरुणाचा खून केल्याचा खुलासा समोर आला आहे. अवघ्या 48 तासात या खुन्यांना पोलिसांनी गजाआड केल्यामुळे सर्व स्तरातून पोलिसांचे कौतुक होत आहे
याप्रकरणी जितू उर्फ जितेंद्र हरिभाऊ दहातोंडे मडया उर्फ विशाल किशोर फाटे विकास सुरेश गायकवाड आणि करण कल्याण साळे. सर्व राहणार वडगाव कोल्हाटी, वाळूज एमआयडीसी, औरंगाबाद हे चौघे जण 18 मे रोजी मध्यरात्री नाशिककडे पळून जाण्याच्या तयारीत आहे आणि सध्या खवड्या डोंगरा जवळ उभे असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांना मिळाली.
विजय घेरडे यांनी पोलिस कर्मचारी यांच्यासह खाजगी वाहनाने जाऊन मोठ्या शिताफीने त्यांना पकडले. यावेळी विशाल फाटे व करण साळे यांनी या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करून विशाल फाटेला काही अंतरावरच पकडले. या तिघांना पोलिसांनी साडेतीन ते चार वाजे दरम्यान पकडले तर करण साळे हा पळून वडगावजवळ एका शेतात लपून बसलेला असताना 19 मे पहाटे पावणे सहा वाजेच्या सुमारास त्याला पोलिसांनी पकडले. या चौघा जणांवर यापूर्वी खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, दंगल घडवणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
मयत योगेश प्रधान आणि आरोपी जितेंद्र दहातोंडे याचा भाऊ राजू दहातोंडे यांच्यात आठ महिन्यापूर्वी कोलगेट चौकात वाद झाला होता. यावेळी योगेश प्रधान याने राजू दहातोंडे त्याच्यावर चाकूने हल्ला केल्यामुळे जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून योगेश प्रधान याच्यावर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तेव्हापासून हा वाद सुरू झाल्याची चर्चा आहे. योगेश प्रधान याने आपल्या भावावर खुनी हल्ला केल्याच्या रागातून आणि परिसरात दहशत कायम राहावी. या उद्देशाने योगेश प्रधान याला भरचौकात दगडाने ठेचून आणि चाकूने वार करून खून केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.दिवसाढवळ्या खून करून पोलिसांसमोर आव्हान उभे केल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती मात्र पोलिसांनी या चौघांना पकडून गजाआड केल्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.
पोलिसांनी या चौघांना अटक करून न्यायालयासमोर सादर केले असता न्यायालयाने या चौघांना 23 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय घेरडे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बांगर, पोहेका. रामदास गाडेकर, वसंत शेळके, नामदेव जीवडे, फकीरचंद फडे, बाबासाहेब काकडे, अविनाश ढगे, विनोद आघाव, बंडू गोरे, प्रदीप कुठे यांच्या पथकाने पार पाडली.