*धक्कादायक! घरगुती वादातून महिलेसह दोन मुलांची हत्या, पतीला अटक*
*धक्कादायक! घरगुती वादातून महिलेसह दोन मुलांची हत्या, पतीला अटक*
- क्राईम टाईम्स ब्युरो

करोना टाळेबंदीत इतर गुन्हे कमी झाले असले तरी कौटुंबिक वादाच्या घटनात वाढल्याचे आठवड्यातील दुसऱ्या घटनेमुळे समोर आले आहे. शहरातील पेठ बीड भागात एका महिलेसह दोन मुलांची निर्घृणपणे हत्या झाल्याचे रविवारी दुपारी उघडकीस आले. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले असून मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
बीड शहरात रविवार, २४ मे रोजी दुपारी पेठ भागात तिघांचे मृतदेह आढळून आले. संगीता संतोष कोकणे (वय ३१), संदेश संतोष कोकणे (अंदाजे वय १०) या दोन्ही माय लेकाचे मृतदेह एका खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले तर मयूर संतोष कोकणे (वय ७) याचा मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये आढळून आला. खोलीत मृतदेहाजवळ घरातील साहित्य अस्ताव्यस्त झालेले होते. मोठा दगड आणि रक्त लागलेली क्रिकेटची बॅटही आढळून आली आहे. दगड आणि बॅटने दोन्ही माय-लेकांचा खून झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.
घरातील काही कपडेही रक्ताने माखले होते. घटनेची माहिती कळताच पेठ बीड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. उप विभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत, स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. थरकाप उडवणाऱ्या या हत्याकांडाचे कारण उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. मात्र, ही घटना कौटुंबिक वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, आठवड्यात जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांडाची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच मांगवडगाव (ता.केज) येथे शेत जमिनीच्या वादातून तिघांची हत्या झाली होती.
Nice aisech news dalte raho