*‘गुगल मॅपमुळे माझ्या वैवाहिक जीवनाचं वाट्टोळं झालंय’; ‘त्या’ची पोलिसांत अजब तक्रार!*
*‘गुगल मॅपमुळे माझ्या वैवाहिक जीवनाचं वाट्टोळं झालंय’; ‘त्या’ची पोलिसांत अजब तक्रार!*
तमिळनाडूत / वृत्तसंस्था
बातमीचं शीर्षक वाचून तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की हा काय प्रकार आहे? गुगल मॅप कुठं आणि एखाद्याचं फॅमिली लाईफ कुठं? आपल्याला आवश्यक ते पत्ते किंवा ठिकाणं शोधण्यासाठी गुगल मॅपचा उपयोग होतो. मग त्यामुळे एखाद्याचं फॅमिली लाईफ कसं काय बर्बाद होऊ शकेल? पण हे घडलंय खरं. एका ४९ वर्षांच्या व्यक्तीनेच अशी तक्रार थेट पोलिसांत दाखल केली आहे. वर गुगलवर कारवाई केली जावी, अशी मागणी देखील केली आहे! त्यामुळे पोलीस देखील चक्रावले असून आता याच्या तक्रारीचं करायचं काय? असा प्रश्न पोलिसांना देखील पडला आहे. नक्की काय घडलंय? वाचा!
..तर हा प्रकार घडलाय तमिळनाडूत!
तामिळनाडूच्या नागापट्टणम जिल्ह्यातल्या मईलादुतरई भागामध्ये राहणाऱ्या आर. चंद्रशेखर नावाच्या एका व्यक्तीने ही तक्रार केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की गुगल मॅप्सने त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आग लावली असून त्यामुळे आता त्यांचं लग्न मोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता गुगल मॅप्सला कोर्टात खेचल्याशिवाय थांबणार नाही असा निर्धारच चंद्रशेखर यांनी केला आहे!
चंद्रशेखर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मोबाईलमध्ये आधीपासूनच इन्स्टॉल असलेलं गुगल मॅप्स त्यांनी भेट दिलेल्या चुकीच्या ठिकाणांची माहिती देत आहे. गुगल मॅप्स अशी ठिकाणं दाखवतंय, ज्या ठिकाणी ते गेलेच नाहीत. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांची पत्नी सातत्याने गुगल मॅप्सवरच्या ‘युअर टाईमलाईन’ या सेक्शनमध्ये जाऊन ते कुठे कुठे गेले होते, यावर नजर ठेवते आहे. तिथली ठिकाणं पाहून ती रात्रभर चंद्रशेखर यांना झोपू देत नाही. वारंवार संशय घेते आणि त्यांना त्या ठिकाणांबद्दल विचारत राहाते. पूर्णवेळ ती याबद्दलच विचार करत राहाते. त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर होऊ लागला आहे. आता तर प्रकरण इतकं टोकाला गेलं आहे की त्यातून कौटुंबिक कलह, हिंसा आणि शारिरीच जाच देखील होऊ लागला आहे.
चंद्रशेखर म्हणतात, ‘मी तिच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाहीये. आमचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तिला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ती ऐकायला तयार नाहीये. तिचा दुसऱ्या कशाहीपेक्षा गुगलवर जास्त विश्वास आहे. त्यामुळे गुगलमुळे माध्या आयुष्यात कलह निर्माण झाला आहे. त्यामुळे गुगलविरोधात कारवाई व्हायलाच हवी. गुगलकडून मला नुकसान भरपाई देखील मिळायला हवी.
दरम्यान, पोलिसांनी चंद्रशेखर यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केलेला नाही. शिवाय, या प्रकरणात तो दाखल होण्याची देखील शक्यता कमी आहे. मात्र, चंद्रशेखर आणि त्यांच्या पत्नीला लवकरच पोलीस स्थानकात बोलवून त्यांचं समुपदेशन करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यानंतरच या प्रकरणात पुढची दिशा ठरवली जाईल, असं द न्यूज मिनटने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.