September 23, 2024

*कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढवला, अन्य भाग टप्प्याटप्प्याने खुला होणार*

0
Contact News Publisher

कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढवला, अन्य भाग टप्प्याटप्प्याने खुला होणार

दिल्ली / वृत्तसंस्था

नवी दिल्लीः कोरोना संसर्गामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत उद्या रविवारी संपत असतानाच केंद्र सरकारने शनिवारी देशातील कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊनला ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही घोषणा केली. कंटेनमेंट झोन वगळता देशातील अन्य भागातील आर्थिक व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील, असेही गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा उद्या रविवारी संपत आहे. २५ मार्च रोजी देशात पहिल्यांदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. कंटनेमेंट झोनमध्ये अत्यंत कठोरपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल, असे गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

 राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेशांशी चर्चा करून लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला होता. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा केली.

टप्प्याटप्प्याने सुरू होणार कंटेनमेंटबाहेर व्यवहार

पहिल्या टप्प्यात हॉटेल्स, धार्मिक स्थळे : लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यातही गृह मंत्रालयाने कोणते व्यवहार कधी सुरू करायचे याची रूपरेषा आखली आहे. त्यानुसार कंटेनमेंटबाहेरील भागात पहिल्या टप्प्यात ८ जूनपासून धार्मिक स्थळे  हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, शॉपिंग मॉल्स आणि अन्य हॉस्पिटॅलिटी सेवा उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दुसऱ्या टप्प्यात शाळा-महाविद्यालयेः दुसऱ्या टप्प्यामध्ये शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस उघडण्याची परवानगी दिली जाणार आहे. राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेशांशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

तिसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय विमानसेवाः तिसऱ्या टप्प्यात परिस्थितीचा आढावा घेऊन अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक, मेट्रो रेल्वे, चित्रपटगृहे, जिम्नॅशियम, जलतरण तलाव, करमणूक पार्क उघडण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

रात्री ९ ते सकाळी ५ पर्यंत संचारबंदीः कंटेनमेंट झोनसह देशातील सर्व भागात रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत देशभरात संचारबंदी लागू राहील. या काळात फक्त जीवनावश्यक, वैद्यकीय, अत्यावश्यक सेवांनाच परवानगीच असेल.

 आरोग्य मंत्रालय जारी करणार मार्गदर्शक सूचनाः कंटेनमेंट झोनबाहेर टप्प्याटप्प्याने सुरू करावयाच्या व्यवहारांबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालय केंद्रीय मंत्रालये, संबंधित विभाग आणि इतरांशी चर्चा करून स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस जारी करणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक बाबतीत सोशल डिस्टन्सिंगचे कठोरपणे पालन केले जाईल, याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending