…अन् ‘ मृतदेह ’ चक्क उठून उभा राहिला, पोलिसही हैराण

- क्राईम टाईम्स डिजिटल टीम
खेडेगावातील चिंचेच्या झाडाखाली बेवारस मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस यंत्रणेसह तिथे पोहचले आणि तपासणी सुरू असताना त्या व्यक्तीच्या डोळ्यांची हालचाल झाली. तो मृत नसून जिवंत असल्याचे खात्री पटल्यावर लोकांनी त्याला पाणी पाजले. थोड्यावेळातच ती व्यक्ती ताडकन उठून उभी राहिली. राहाता तालुक्यातील केलवड गावात ही घटना घडली असून ग्रामस्थांच्या दक्षतेमुळे एक भूकबळी जाताजाता वाचला.
ममता बॅनर्जींच्या विजयामागे शरद पवारांचे अदृश्य हात, भाजप नेत्याच मोठं विधान
राहाता तालुक्यात केलवड गाव आहे. गावापासून काही अंतरावर शिर्डी बायपासवर एका चिंचेच्या झाडाखाली एक व्यक्ती दोन दिवसांपासून निपचित पडून असल्याचे काही गावकऱ्यांनी पाहिले. त्यांना ती व्यक्ती मरण पावली असावी, असा संशय आला. त्यांनी ही माहिती पोलिस पाटील सुरेश गमे यांना दिली. गमे यांनी ही माहिती राहाता तालुका पोलिसांनी कळविली. गावात बेवारस मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुभाष भोये आपल्या सहकाऱ्यांसह तेथे दाखल झाले. त्या कथित मृतदेहाची पाहणी सुरू झाली.
राज्यातील शाळांना १ मेपासून सुट्टी जाहीर; १४ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष
पोलिस नाईक पंकज व्यवहारे, पोलिस नाईक चंद्रकांत भोंगळे व इफ्तिकार सय्यद यांनी जवळ जाऊन पाहणी केली. त्यावेळी व्यवहारे यांना त्या व्यक्तीच्या डोळ्यांची हालचाल झाल्याचे जाणवले. त्यामुळे हा मृतदेह नसून जिवंत व्यक्ती असल्याची खात्री पटली. त्यामुळे तातडीने हालचाली सुरू झाल्या. त्या व्यक्तीला पाणी पाजण्यात आले. ओआरएस पेयही आणून पाजण्यात आले. त्यामुळे अंगात त्राण आल्याने ती व्यक्ती उठून बसली. आपल्याभोवती जमलेली गर्दी, आलेले पोलिस पाहून भांबावून गेल्याने थोडी शुद्ध येताच ती व्यक्ती तडक उठून उभी राहिली.
सोनिया गांधी, पवारांसह विरोधी पक्षनेत्यांकडून मोदींना घेरण्याची तयारी; केली ‘ही’ मागणी
पोलिसांनी विचारपूस सुरू केली असता व्यक्तीने आपले नाव पंकज चंद्रकांत सोनवणे (वय ५५, रा. अंमळनेर, जि. जळगाव) असे सांगितले. रेल्वेत लेखा विभागात नोकरीला असल्याचे सांगितले. त्याच्या खिशात मोबाईल, नाव, पत्ता सापडला. त्यावरूनही खात्री पटली. पोलिसांनी त्याच्या भावाशी संपर्क केला. भाऊ त्याला घेण्यासाठी जळगावहून राहात्याकडे निघाला आहे. मात्र सोनवणे तेथे कसे आले? याबद्दल त्यांनाही काही सांगता आले नाही.
सोनवणे यांच्या अंगावरील कपडे खराब झाल्याने पोलिस पाटील गमे यांनी त्यांना दुसरे कपडे दिले. त्यांना चहा-बिस्कीटे देण्यात आली. अंघोळ घालण्यात आली. सोनवणे यांच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. त्यामुळे ते निपचित पडले होते. त्यांच्या भावाने सांगितले की ते शांत स्वभावाचे आणि हळवे आहेत. रेल्वेत नोकरी करतात, मात्र तेथे कसे गेले ते सांगता येणार नाही. स्वत: सोनवणे यांनाही याबद्दल काहीच आठवत नाही. त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. त्यांचे भाऊ आल्यावर त्यांना ताब्यात देण्यात येणार आहे.
सोनवणे यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी त्यांना जेवणही दिले. ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. बरेच दिवस उपाशी असल्याने त्यांना प्रचंड थकवा आला आहे. त्यामुळे ते झाडाखाली निपचित पडले होते. काहीच हालचाल दिसत नसल्याने दूरून पाहणाऱ्या ग्रामस्थांना तो मृतदेह वाटला. मात्र गावकऱी आणि पोलिस पाटील यांच्या तत्परतेमुळे सोनवणे यांचा जीव वाचला.पोलिसांनी योग्य वेळी दखल घेतल्याने एका व्यक्तीचा भूकबळी जात जाता वाचला आहे तर दुसरीकडे कोरोनाने देशात किती भयावह परिस्थिती निर्माण केली आहे हे देखील स्पष्ट झाले आहे .