लॉकडाऊन उघडणार अशी अपेक्षा ठेवू नका : राजेश टोपे

- क्राईम टाईम्स टीम
मुंबई :- राज्यात कोरोनाचा (Corona virus) संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला आहे. लॉकडाऊनची मुदत १५ मे रोजी संपत आहे. १५ मेनंतर आणखी काही दिवस लॉकडाऊन वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. याबद्दल बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.
राजेश टोपे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन कोरोना परिस्थितीबद्दल केलेल्या उपाययोजनेची माहिती दिली. तसेच लॉकडाऊनबद्दलही भाष्य केले आहे. “येत्या १५ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत आपण जे निर्बंध घातले आहेत, ते वाढवायचे की काही निर्बंध कमी करायचे, यावर मंत्रिमंडळात निर्णय होऊ शकतो.” असे टोपे म्हणाले. सध्या असलेले निर्बंध हळूहळू शिथिल होतील, असा माझा अंदाज आहे. लगेच १०० टक्के मोकळीक दिली जाईल किंवा १०० टक्के सगळे खुले होईल, अशी अपेक्षा कोणी करू नये. यावर चर्चा होईल. त्यानंतर मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील, असेही टोपे यांनी सांगिलते.
तसेच, राज्यात १ कोटी ८४ लाख लसीकरण झाले आहे. आता ३५ हजार कोवॅक्सिन उपलब्ध आहे. शासनाने खरेदी केलेली तीन लाख कोवॅक्सिन ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस देणे गरजेचे आहे. वय १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे जाहीर केले होते. पण लसीचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. दुसरा डोस न दिल्यास पहिला डोस वाया जाऊ शकतो. १८ वर्षांवरील लसीकरणाचा वेग काही दिवस स्लो डाऊन करावे लागेल, टास्क फोर्ससमवेत चर्चा करून कॅबिनेट चर्चा करून निर्णय करू, असे टोपे यांनी स्पष्ट केले.