‘राज्यात १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण तूर्तास स्थगित’, राजेश टोपेंची घोषणा

- क्राईम टाईम्स टीम
मुंबई : केंद्र सरकारने १ मेपासून देशातील १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास (Coronavirus Vaccination) सुरुवात करण्याची घोषणा केली होती. मात्र लसींच्या कमी पुरवठ्यामुळे आता राज्य सरकारने १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सध्या महाराष्ट्रात ४५ वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य द्यावं लागेल. म्हणूनच १८ ते ४४ वयोगटाला तुर्त लस मिळणार नाही, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठीकीनंतर केली.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले, तूर्तास महाराष्ट्रात १८-४४ वयोगटातील लसीकरण स्थगित करत आहोत. सीरमचे प्रमुख आदर पुनावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना भेटले. त्यांनी २० मे नंतर महाराष्ट्राला दर महिन्याला दीड कोटी डोसेस देऊ असं स्पष्ट केलं आहे. त्याची विगतवारी कशी करायची याबाबत ते लंडनहून भारतात आल्यावर निर्णय घेतील. ४-५ दिवसानंतर अधिक प्रमाणात लस उपलब्ध झाली की पहिल्या डोसचा निर्णय घेवू, अशी माहितीही टोपे यांनी दिली.
४५ वरील व्यक्तींना दुसरा डोस भारत सरकार देवू शकत नाही. त्यामुळं दुसरा डोस देणं गरजेचं असल्यानं महाराष्ट्र सरकारने खरेदी केलेली लस ही ४५ वर्षांवरील लोकांना दिली जाणार आहे. दुसऱ्या डोससाठी २० लाख डोस हवेत. सध्या केवळ १० लाख आहेत. पहिल्या डोसची लगेच अपेक्षा करू नये, असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.
आरोग्य विभागात १६ हजार पदे तातडीने भरली जाणार; राजेश टोपेंची माहिती
राजेश टोपे म्हणाले, राज्यातील लॉकडाऊन (Lockdown) हे १५ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय़ मंत्रिमंडळाने घेतल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले. लॉकडाऊन केल्यानंतर राज्यातील रुग्णांची संख्या घटली आहे. भारतातील सरासरी रुग्णवाढीपेक्षा महाराष्ट्रातील रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाले आहे. राज्यातील रुग्णसंख्या कमी होत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काही दिवस वाढावा, असा कल मंत्रिमंडळाने दर्शवला. तसेच मुख्यमंत्र्याना सांगण्यात आले. आता याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.