September 21, 2024

तरुणाने ठोकला वाघाच्या पिंज-यात मुक्काम; सिध्दार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील थरारक घटना

0
Contact News Publisher

सिध्दार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील थरारक घटना

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • (संग्रहित छायाचित्र)

औरंगाबाद: रात्रीच्या वेळी एका तरुणाने भिंतीवरुन मनपाच्या प्राणीसंग्रहालयात उडी मारली. मात्र, आतील अंदाज न आल्याने हा तरुण नेमका वाघाच्या पिंजऱ्यातील सर्व्हिस एरियात म्हणजे वाघाला फिरण्यासाठीच्या मोकळ्या जागेत पडला. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने वाघ आतील छोट्या पिंजऱ्यात बंदीस्त होता. रात्रभर या तरुणाने तिथेच मुक्काम ठोकला. सकाळी हा प्रकार समोर आल्यावर प्राणीसंग्रहालय प्रशासनाने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. हा तरुण मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्राणीसंग्रहालयात दोन दिवसांपूर्वी सकाळी हा प्रकार घडल्याची माहिती गुरुवारी समोर आली. प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनीही त्यास दुजाेरा दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविंद्र ससाणे (३० रा. श्रीकृष्णनगर, पिसादेवी ) असे आहे. हा तरुण मनोरुग्ण असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी रात्री प्राणीसंग्रहालयातील वाघांना नेहमीप्रमाणे सर्व्हिस एरियातून आतील छोट्या पिंजऱ्यात बंद करण्यात आले होते. रात्री उशिरा या तरुणाने प्राणीसंग्रहालयाच्या मागील बाजूने भिंतीवरुन आत उडी मारली. आता तो नेमका वाघाच्या पिंजऱ्यात सर्व्हिस एरियात पडला. मात्र, वाघांना आतील पिंजऱ्यात बंद करण्यात आलेले होते. त्यामुळे त्याला कोणताही धोका झाला नाही. वाघाच्या पिंजऱ्यातील बाहेर पडण्यास रस्ता नसल्याने तो रात्रभर तिथेच बसून होता. शेवटी सकाळ झाल्यानंतर हा प्रकार कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी वरिष्ठांना त्याची कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांना बोलावून या तरुणाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी काही वेळ त्याची चौकशी केली. मात्र, तो वेडसर असल्याचे समोर आले. पोलिसांनी शेवटी त्याच्या वडिलांना बोलावून त्यास त्यांच्याकडे सोपविले.

संरक्षण भिंत पडण्याचा धोका

प्राणीसंग्रहालयातील मागील बाजूची भिंत अनेक ठिकाणी कमकूवत झालेली आहे. सुरक्षेच्यादृष्टीने या भिंतीच्या मजबुतीकरणासाठी आणि त्यावर काटेरी तार लावण्यासाठीचा प्राणीसंग्रहालय प्रशासनाने वेळावेळी मनपा प्रशासनाला पत्र दिलेले आहे. मात्र, आतापर्यंत त्यावर कार्यवाही झालेली नाही. या प्रकारानंतर मनपा आयुक्तांनी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना अधिकाऱ्यांनी केली. याआधीही प्राणीसंग्रहालयात वाघाच्या पिंजऱ्यात एखाद्या व्यक्तीने उड्या घेतल्याच्या घटना वारंवार घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आणखी पाच सेक्यूरिटी गार्ड प्राणीसंग्रहालयात उपलब्ध करुन देण्याची मागणीही प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्याचे सूत्रांकडून समजते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending