September 22, 2024

राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणाः वाचा उद्यापासून काय सुरू, काय बंद राहणार?

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

मुंबईः राज्यातील कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला असून निर्बंध आणखी कडक केले आहेत. नव्या निर्बंधांनुसार पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली असून रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक बाबी वगळता कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. नवीन निर्बंध सोमवार, १० जानेवारीपासून लागू होतील.
राज्य सरकारने आज, शनिवारी नवीन निर्बंधाची सूचना जारी केली आहे. नव्या निर्बंधांत लग्न समारंभापासून ते सर्वच सार्वजनिक कार्यक्रमातील उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध घातले आहेत.

हेही वाचा : औरंगाबाद जिल्ह्यात- घरकुल प्रपत्र ‘ड’ यादी सर्वेक्षण सुरू

असे आहेत नवीन निर्बंधः

  • पहाटे ५ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र फिरता येणार नाही. म्हणजेच जमावबंदी लागू असेल.
  • रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत अत्यावश्यक बाबी वगळता कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही, प्रवास करता येणार नाही. म्हणजेच संचारबंदी लागू असेल.
  • लग्न समारंभात जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्याच उपस्थितीला परवानगी असेल.
  • अत्यंविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येईल.
  • सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असेल.
  • स्विमिंग पूल, स्पा, जिम, वेलनेस सेंटर्स आणि ब्युटी पार्लर्स बंद राहतील.
  • हेअर कटिंग सलूनला क्षमतेच्या ५० टक्के परवानगी असेल. रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत हेअर कटिंग सलून बंद राहतील. कोविड अनुरूप वर्तनाचे काटेकोर पालन करावे लागेल.
  • नाट्यगृह, सिनेमा थिएटर्स ५० टक्के क्षमतेने चालवता येणार. दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच परवानगी. रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद ठेवावी लागतील.
  • लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, सलून, दुकान, रेस्टॉरंट मालकावर कारवाई करण्यात येईल.
  • पूर्वनियोजित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धावगळता अन्य क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात येतील. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत प्रेक्षक नसतील. सर्व खेळाडू व पदाधिकाऱ्यांसाठी बायो-बबल वापरावे लागेल. प्रत्येक तिसऱ्या दिवशी सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल.
  • शहर किंवा जिल्हास्तरीय क्रीडा शिबीर, स्पर्धा किंवा कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही.
  • प्राणी संग्रहालये, करमणूक पार्क, किल्ले किंवा अन्य तिकिट लावून असलेली ठिकाणे/ कार्यक्रम सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असतील.

हेही वाचा : वेरूळ घृष्णेश्वर मंदिरच्या मालकी हक्काबाबतचा दावा; राजपत्राला की सातबाऱ्याला महत्त्व द्यावे; सुनावणीप्रसंगी..

शॉपिंग मॉल्स/ मार्केट कॉम्प्लेक्सः शॉपिंग म़ॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील. रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहतील. क्षमता आणि आतमध्ये असलेल्या अभ्यागंतांची संख्या बाह्यदर्शनी फलकावर लावाली लागेल. संपूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनाच परवानगी असेल.

रेस्टॉरंट्स/खाणावळीः क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. रात्री १० वाजता बंद होतील आणि सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहतील. एकूण क्षमता आणि सध्या आतमध्ये असलेल्या अभ्यागंतांची संख्या बाह्य दर्शनी भागावर लिहावी लागेल. संपूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनाच परवानगी. संपूर्ण दिवसभर होम डिलिव्हरीला परवानगी असेल.

शाळा/महाविद्यालयेः शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. मात्र, इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी बोर्डाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कृती कार्यक्रमांना परवानगी असेल.
वर्गातील शिकवणीखेरीज शिक्षकांच्या प्रशासकीय कामकाजाला परवानगी असेल. शालेय शिक्षण विभाग, कौशल्य विकास विभाग, उच्च व तंत्रशित्रण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग किंवा अन्य वैधानिक प्राधिकाऱ्याने परवानगी दिलेल्या बाबींना परवानगी असेल.

हेही वाचा : मंजूर है, मंजूर है.. च्या यादीत 6 वर्षांपूर्वीचा प्रस्ताव आला अन् औरंगाबाद ZP महिला.., काय घडलं?

देशांतर्गत प्रवासः राज्यात येणाऱ्या प्रवाश्यांना दोन्ही डोस किंवा पोहोचण्याच्या ७२ तास आधी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य असेल. हवाई वाहतूक, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीने प्रवास करणाऱ्यांसाठी हे लागू राहील.

सार्वजनिक वाहतूकः केवळ संपूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनाच सार्वजनिक वाहतुकीने प्रवासाची परवानगी असेल. सार्वजनिक वाहतूक नियमति वेळेत सुरू राहील.

यूपीएससी/एमपीएससी व अन्य स्पर्धा परीक्षाः राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धा परीक्षा केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार होतील. परीक्षेचे हॉलतिकिट हा परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्याचा वैध पुरावा असेल. राज्यस्तरावरील आधीच तारीख जाहीर झालेल्या आणि हॉलतिकिट जारी केलेल्या परीक्षा पूर्वनिर्धारित कार्यक्रमांनुसार होतील. पुढील सर्व परीक्षा एसडीएमएच्या पूर्वपरवानगीनेच आयोजित कराव्या लागतील.

कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका- मुख्यमंत्र्यांची सादः आपण शाळा- महाविद्यालये परत ऑनलाईन केली आहेत. शिक्षण थांबणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यामुळं आपल्याला मिळालेली ही सुट्टी आहे असं समजून इकडे तिकडे अनावश्यक फिरून कोरोनाचे दूत बनू नका असेही आवाहन मी माझ्या तरुण मित्रांना करतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या विषाणूशी लढतांना आपल्याला दोन वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाचा मोठ्या दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पाऊलं उचलत त्या रोखल्या सुद्धा. मात्र आता आपलं रूप बदलून आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, म्हणूनच तो किती धोकादायक आहे किंवा नाही यावर चर्चा न करता या संसर्गाला लवकरात लवकर थोपवणे गरजेचे आहे, अन्यथा आपल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो. याचमुळे वारंवार टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करून तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून आपण राज्यात काही निर्बंध लावण्याचे ठरवले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात नवे निर्बंध लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर जनतेशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

रोजीरोटी नव्हे, गर्दी बंद करायची आहेः मी स्पष्ट करतो की, आपल्याला कुठलाही लॉकडाऊन करून सगळे ठप्प करायचे नाही. केवळ कायदे आणि नियम करून अशा आव्हानांचा मुकाबला होऊ शकणार नाही, तर प्रत्येक नागरिकाने मग तो समाजातला कुणीही घटक असो प्रत्येकानं आता ही लढाई अंतिम आहे आणि हा शेवटचा घाव कोरोनावर करायचाच अशा निश्चयानं आरोग्याचे नियम पाळायचे आहेत. आपल्याला काम बंद करायचे नाही तर गर्दी बंद करायची आहे. रोजी रोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही पण काही बंधने पाळून या विषाणूपासून राज्य कायमचे मुक्त करायचे आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending