शिंदे गटाला मोठा धक्का!; उच्च न्यायालयाने फेटाळली शिंदे गटाची याचिका
मुंबई : शिंदे आणि ठाकरे गटामध्ये दसरा मेळाव्यावरून उच्च न्यायालयात चांगलाच वाद सुरू आहे. या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाकडून दाखल केलेली हस्तक्षेप याचिका फेटाळली आहे. मैदान देण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज (२३ सप्टेंबर) सुनावणी झाली. यामध्ये ठाकरे गट, शिंदे गट आणि पालिकेच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला. शिंदे आणि ठाकरे गटाने उच्च न्यायालयात आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा युक्तिवाद केला. तुमचा युक्तिवाद मर्यादेत ठेवा, निर्णयही द्यायचा आहे, असे उच्च न्यायालयाने सांगितले.
शिवतीर्थावर मेळावा घेण्याची परवानगी ठाकरे गटाला मिळावी यासाठी ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सदा सरवणकर यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करत आम्हीच खरी शिवसेना आहोत. यामुळे शिवाजी पार्कची जागा आम्हाला मिळायला हवी, अशी याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने शिवसेना नेमकी कोणाची हा विषयच नसल्याचे म्हणत ही याचिका फेटाळली असल्यामुळे शिंदे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेता येणार नसल्याचे स्पष्ट आहे. दरवर्षी शिवसेनेच्यावतीने सदा सरवणकर हे महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज करत होते. त्यामुळे माझ्या अर्जालाच परवानगी दिली गेली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.