September 22, 2024

कोरोना कालावधीत पोलीस पाटलांनी बजावलेली कामगिरी कौतुकास्पद- मंत्री चंद्रकांत दादा पाटील

0
Contact News Publisher

पालकमंत्र्यांच्या हस्ते कोरोनाने निधन झालेल्या पोलीस पाटील यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदानाचे वाटप

  • क्राईम टाईम्स टीम

पुणे दि १५: गावची कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटलांची भूमिका महत्त्वाची आहे. कोरोना कालावधीत पोलीस प्रशासनासोबतच पोलीस पाटलांनी बजावलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी मोठी मदत झाली, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयातील भीमा शंकर हॉलमध्ये पुणे ग्रामीण पोलीस दल स्मृतिचिन्हांचे अनावरण श्री. पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, श्रीमती उषा लक्ष्मण आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोना संसर्गाच्या कालावधीत पोलीस प्रशासन, आरोग्य तसेच स्चच्छता कर्मचारी यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. पोलीस प्रशासनाला नागरिकांनीही चांगले सहकार्य केले. सर्वांच्या मदतीमुळे संसर्ग रोखण्याबरोबरच अनेकांचे प्राणही वाचले आहेत. कोरोना कालावधीत कार्य करताना काही पोलीस पाटलांना यामध्ये आपले प्राण गमवावे लागले, प्राण अमूल्य आहेत मात्र त्यांच्या कुटुंबियांना काही प्रमाणात का होईना मदत देण्यात येत आहे. प्रत्येक अडचणीच्या वेळी शासन त्यांच्या कुटुंबासोबत असेल, असे त्यांनी सांगितले.

पोलीस प्रशासनाला गुन्ह्यांचा तपास करताना साक्षीदार अत्यंत महत्त्वाचा आहे. साक्षीदाराच्या साक्षीनेच गुन्ह्याचा तपास उलगडण्यात मदत होते. त्यामुळे आज गौरव करण्यात येत असलेले साक्षीदार नागरिक यांची कामगिरी समाजासाठी महत्त्वाची ठरणार आहे. सर्वसामान्य माणसासाठी पोलीस यंत्रणेला सहकार्य देण्याबाबतचे प्रशिक्षण, तपासातील कौशल्य याबाबत मार्गदर्शन मिळाले तर गुन्ह्यांचा तपास गतीने होईल, असेही श्री. पाटील म्हणाले.

श्री. लोहिया म्हणाले, जनतेसोबतचे पोलिसांचे सबंध वाढावेत यासाठी हे स्मृतिचिन्ह तयार करण्यात आले आहे. समाजाची सेवा करताना आपण समाजसेवक आहोत या भावनेने पोलिसांनी काम करावे, तसेच कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर सर्वसामान्यांसाठी करावा, असेही ते म्हणाले.

पोलीस अधीक्षक डॉ.देशमुख म्हणाले, पोलीस व सर्वसामान्य नागरिक यांच्यातील सहकार्याचे नाते स्पष्ट करणारे स्मृतिचिन्ह महत्वाचे आहे. कोरोना कालावधीत पोलीस पाटील यांनी केलेले सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरले. पोलीस प्रशासन व नागरिक एकत्रितपणे समाजात चांगले काम करूया, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्रीमती उषा लक्ष्मण यांनीही मनोगत व्यक्त केले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते कोरोनाने निधन झालेल्या पोलीस पाटील यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले तसेच पोलीस तपासात सहकार्य केलेल्या नागरिकांचाही पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिल्पकार गिरीश चरवड व प्रशांत गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस दलातील अधिकारी, पोलीस पाटील, त्यांचे कुटुंबिय, नागरिक उपस्थित होते.

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending