कायदा सुव्यवस्था बिघडली, विशेष अधिवेशन बोलवा; राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

- क्राईम टाईम्स टीम
मुंबई : मागील काही दिवसांपासून बलात्काराच्या घडलेल्या घटना, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना केलेली अटक आणि काल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूरमध्ये केलेल्या प्रदेशबंदीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना खरमरीत पत्र लिहिले आहे.
राज्यपाल कोश्यारींनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका बलात्कारप्रकरणावरून कायदा सुव्यवस्थेकडे बोट दाखवलं आहे.इतकंच नाही तर राज्यपालांनी कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्यपालांनी कायदा सुव्यवस्थेची दखल घेणं, त्यात अधिवेशन बोलावण्याच्या सूचना करणं हे म्हणजे राज्याच्या सक्रिय राजकारणात वाढत्या हस्तक्षेपाचं द्योतक आहे, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वीही मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. जून २०२१ मध्येही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, विधानसभा अध्यक्ष निवडीची आठवण करून दिली होती. ५ आणि ६ जुलैला विधानसभेचं पावसाळी अधिवेशन होतं. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. या पत्रात राज्यपालांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या असल्याचे म्हणत योग्य कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांना दिले होते.