September 22, 2024

राज्यावर पुन्हा पावसाचे सावट; मराठवाडा, विदर्भात गारपीट तर उत्तर महाराष्ट्रात पावसाचा इशारा

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

पुणे : वातावरणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यावर २८ डिसेंबरपासून पुन्हा पावसाचे सावट आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारपीट आणि विजांच्या कडकडाटात पाऊस, तर उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. कोकण विभागात मात्र हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ( Hailstorm in Marathwada)

महाराष्ट्रासह उत्तर आणि मध्य भारतातही अनेक ठिकाणी या काळात पाऊस पडेल. डिसेंबरच्या सुरुवातीला अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात बहुतांश भागात पाऊस झाला. दुसऱ्या आठवड्यापासून हवामान कोरडे होते. त्यानंतर उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह येऊ लागलेत. काही प्रमाणात थंडी पडली. विदर्भात दोन ते तीन दिवस थंडीची लाट होती. उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह मंदावल्यानंतर तापमानात काही प्रमाणात वाढ झाली. सध्या उत्तर भारतामध्ये वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे. या भागात कमी दाबाचा एक पट्टा तयार होणार आहे. त्याचप्रमाणे दक्षिण-पश्चिम राजस्थान ते थेट विदर्भापर्यंत कमी दाबाचा एक पट्टा तयार होतो आहे. हा पट्टा पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्यप्रदेश ओलांडून येणार आहे. त्यामुळे या सर्व भागांसह महाराष्ट्रातही २८ आणि २९ डिसेंबरला काही भागात पाऊस पडू शकतो.
महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल या राज्यांतही २७ डिसेंबरनंतर दोन ते तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही भागांत २८ डिसेंबर, तर विदर्भात काही भागांत २८ आणि २९ डिसेंबरला गारा पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात सध्या जवळपास सर्वच ठिकाणी रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा काही प्रमाणात अधिक आहे. त्यामुळे रात्री थोडा गारवा जाणवतो आहे. पावसाळी स्थितीत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending