बागायतदारांचे बंगले ‘लक्ष्मी विनाच’; लग्नासाठी पोरं शहरात कामाला…

मुलींना हवाय सिटीतला नवरा, वर्षभराच्या पगाराहून अधिक उत्पन्न एका पिकात
- क्राईम टाईम्स टीम
- दीपक सिरसाठ
अंधारी :- नोकरी आहे का? पॅकेज किती? शहरात राहणार का? असे एक ना अनेक प्रश्न मुलीकडील पाहुण्या कडून विचारले जात असल्याने लग्नाचे वय होऊनसुद्धा शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नगाठ बांधली जात नसल्याने शेतकर्यांच्या मुलावर वयाची 30- 35 वर्षे ओलांडूनही लग्नाविना राहण्याची वेळ आली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आता मुलांना कंपनीमध्ये नोकरीसाठी पाठवण्यास सुरू केलं आहे. वर्षभरातील त्याच्या पगाराची रक्कम आणि एका पिकात तेवढे उत्पन्न निघते हे वास्तव आहे.
सिल्लोड तालुक्यातील अंधारी सह परिसर कापूस या पिकांमुळे ग्रीन बेल्ट म्हणून समजला जातो. मागील वर्षीपासून पाऊसमान बऱ्यापकी असल्याने शेतकरी कापसा सारखी पिके घेऊ लागले आहेत. कापसा सारखे किमती पिके घेतल्यामुळे त्यातून लाखो रुपयांची कमाई शेतकऱ्यांना होत आहे. कापूससारख्या पिकातून मिळालेल्या उत्पादनाच्या पैशातून शेतकऱ्यांनी सर्व सुख सुविधा युक्त अलिशान बंगले बांधले आहेत. शिवाय अलिशान गाड्या दिमतीला आहेत. शेतकऱ्यांसमोर वयात आलेल्या आपल्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावू लागला आहे.
अंधारीसह लोणवाडी मांडगाव दिडगाव उपळी आदी खेडेगावातून वयात आलेली मुले लग्नापसून वंचित आहेत. मुलींना ग्रामीण भागात संसार करण्याची आवड वा इच्छा नाही. ग्रामीण भागातील मुलीसुद्धा ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या घरात लग्न करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
मुलगा पदवीधर असला, तरी त्यास चांगली बागायती व उत्पन्न देणारी शेती असली, तरी मुलींना शेतकरी नवरा नकोय. शहरात राहणारा, नोकरी करणारा मुलगा पसंत करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे 30-35 वर्षाचे वय होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न ही मोठी समस्या निर्माण झाली आहे.
चौकट :-
बोहल्यावर चढू पाहणाऱ्या मुलांनी करायचं काय…?
अशी तिची केवळ औरंगाबाद जिल्ह्यातच नव्हे तर सबंध महाराष्ट्रभर आहे. नोकरीमध्ये मिळणाऱ्या पैशात आणि शहरात राहण्याच्या हौसेखातर ग्रामीण भागातील मुलींना शेतकरी मुलगा पसंत नाही. असे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. अगदी शेतकरी राजा ही आपली मुलगी नोकरदारालाण द्यावी यावर ठाम असतात. मग अशा मुलांनी करायचं काय …?असाही सवाल बोहल्यावर चढू पाहणाऱ्या युवकांमधून होऊ लागला आहे.
चौकट :- शेतकऱ्याच्या मुलाचे वय होऊनही त्यांची लग्न जमत नाहीत. ही मोठी समस्या शेतकरी कुटुंबात असून, शेतकरी साऱ्या जगाचा पोशिंदा आहे. लाॅकडाऊन मध्ये सर्व क्षेत्रे बंद होती. पण शेतकऱ्याची शेती सुरू होती. याचा विचार करून याविषयी प्रबोधन होणे गरजेचे आहे.
एक शेतकरी (अंधारी )
चौकट :-
पुतण्या चे वय होऊनही लग्न जमत नसल्याने नाविलाजाने शहरातील कंपनीत कामाला पाठवले आहे. आता लग्न जमतील अशी आशा आहे. मला जमीन असुन आहे आणि मुलाला 16 हजार पगार आहे. यापेक्षा शेतात उत्पन्न जास्त मिळते.
-एक शेतकरी